बुलडाणा- कोरोना काळात आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे, अंशकालीन कर्मचारी घोषित करून शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोना कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज (१८ डिसेंबर) कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोर निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
कायमस्वरूपी किंवा एनआरएचएममध्ये समायोजन करण्याची मागणी -
राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली. कोरोनासारख्या महामारीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभागात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा दिली. अशा परिस्थितीत कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात गावातील लोकांनी व नातेवाईकांनी तुच्छ वागणूक दिली, कठीण काळात कर्तव्य बजावले. कोरोना काळातील कंत्राटी पद्धतीची नियुक्ती संपुष्टात येत असून आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हा सर्वांना आरोग्य विभागातील रिक्त पदी नेमणूक करून कायमस्वरुपी किंवा एनएचएम रोजगाराची संधी उपलबध करून द्यावी, तसेच येणाऱ्या काळात कोरोना लसीकरणासाठी प्रशिक्षण देऊन कामाची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र ‘गरज सरो वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होताच, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका घेतली आहे. ही पूर्णत: चुकीची असून संकट काळामध्ये राज्याच्या आरोग्यविभागाला साथ देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पात्रतेनुसार रिक्त पदांवर नियुक्ती आदेश देण्यात यावेत किंवा किमान ११ महिन्याच्या कंत्राटी आदेश देवून हळूहळू रिक्त होणाऱ्या जागांवर कायम नियुक्ती देण्यात यावी.