बुलडाणा - कोरोना लॉकडाऊनच्या काळात जीवाची पर्वा न करता पोलीस दल प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहे. या अत्यावश्यक सेवेतील पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शाबासकी देण्याची वेळ असताना दसरखेळ पोलीस ठाण्याच्या 55 वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पोळ यांना चक्क कारवाईला सामोरे जावे लागले आहे. निमित्त होते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खासगी सचिवाला वाहतूक पास नसल्याने अडवल्याचे.
पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पोळ यांना कर्तव्यावरून पोलीस मुख्यालयात परत बोलावले असून त्यांची चौकशीचे करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ-पाटील यांनी दिले आहेत. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई कोणाच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे, याबाबत वरिष्ठ अधिकारी बोलण्यास नकार देत आहेत.
बुलडाण्याच्या मलकापूर एमआयडीसीजवळील दसरखेड पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल रवींद्र पोळ कार्यरत आहेत. रविवारी २९ मार्चला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आंतरजिल्हा सीमावर्ती चेकपोस्टवर ते तैनात होते. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव वैभव तुमाने हे नागपूरवरून मुंबईला गाडीने जात होते. त्यांच्या वाहनाला नंबरप्लेट नसल्याने पोळ यांना त्यांना चौकशीसाठी थांबवले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खासगी सचिव असल्याचे तुमाने यांनी पोळ यांना सांगितले.