बुलडाणा - जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या नावाची चर्चा रंगत आहे. या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नसल्याने त्याने चक्क आपल्या शेताच्या धुऱ्यावर माजी मुख्यमंत्री फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो लावून 'फसवी कर्जमाफी' या सरकारच्या कालावधीत मला कर्जमाफी मिळाली नाही, असा उल्लेख करत डिजिटल बोर्ड लावला आहे. नीळकंठ लिपते असे शेतकऱ्याचे नाव आहे.
निळकंठ लिपते हे जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील असून त्यांची भिलखेड येथे दोन एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र संग्रामपूर शाखेचं 2011 पासून एक लाख 48 हजाराचं कर्ज आहे. यापूर्वी त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफीसाठी अर्ज केला होता व आताही वर्तमान ठाकरे सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज केला होता. मात्र, दोन्ही सरकारच्या काळात त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या शेतातील बांधावर मोठा डिजिटल बोर्ड लावून प्रत्येकाचे लक्ष वेधले आहे.