बुलडाणा - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकूण 870 पैकी 527 ग्रामपंचायतीच्या जागेसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातही झाली आहे. आज गुरुवारी 24 डिसेंबर रोजी 83 उमेदवारांचे 88 अर्ज दाखल करण्यात आले.
23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
बुलडाणा जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आपापल्या गटातील ग्रामपंचायतींवर आपल्याच गटाचे वर्चस्व राहावे म्हणून जिल्हा परिषद सदस्यही कामाला लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील 10 लाख 34 हजार 33 मतदार आहेत. 1771 प्रभागामध्ये ही निवडणूक होत असून यासाठी 1978 मतदान केंद्रे राहणार आहेत. त्यातच 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून, ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास प्रारंभ झाला आहे. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. दरम्यान, 23 डिसेंबर आणि आज गुरुवारी 24 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण 83 उमेदवारांनी 88 अर्ज भरले आहेत.