बुलडाणा -जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी 7 ते सायं 6 वोजपर्यंत मतदान झाले. संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामीण भागासह शहरी भागातही सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. तर जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 64 टक्के मतदानाची नोंद झाली.
हेही वाचा -सांगलीत मतदानाचा टक्का घसरला; सरासरी केवळ 66 टक्के मतदानाची नोंद...
जिल्ह्यात 59 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. त्यामध्ये मलकापूर मतदारसंघात 11, बुलडाणा 7, चिखली 10, सिंदखेड राजा 10, मेहकर 5, खामगांव 12, जळगांव जामोद मतदारसंघात 4 उमेदवार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी प्रशासकीय इमारतमधील मतदान केंद्रात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा -अक्कलकोटमधील कासेगावाला पाण्याचा वेढा, 700 मतदार मतदानापासून राहणार वंचित?
जिल्ह्यात एकूण मतदानासाठी 2263 मतदान केंद्रे होती. यामध्ये मलकापूर 300, बुलडाणा 335, चिखली 313, मेहकर 348, सिंदखेड राजा 336, खामगांव 316 आणि जळगांव जामोद येथे 315 मतदारकेंद्रांचा समावेश होता. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारासंघामध्ये 10 टक्के मतदानकेंद्रांवर वेब कास्टींग देखील करण्यात आले. प्रत्येक विधानसभा निहाय मतदारक्षेत्रात प्रत्येकी 1 याप्रमाणे 7 सखी, 7 आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सर्व एकूण मतदार केंद्रांवर अंदाजे 64 टक्क्यांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.