भंडारा- केंद्र शासनाच्या धोरणांविरूद्ध बुधवारी विविध संघटनांनी घोषित केलेल्या 'भारत बंद'च्या हाकेला भंडारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी आपले आर्थिक व्यवहार बंद ठेवले होते. मात्र, बस सेवा आणि शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू असल्यामुळे या 'बंद'चा हवा तसा प्रभाव पहायला मिळाला नाही.
या संपाला शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी काही प्रमाणात प्रतिसाद दिला. तरीही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, तसेच रुग्णालय आणि बस सेवा या मात्र सुरळीत सुरू होत्या. तर, महसूल विभाग आणि राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र आपले व्यवहार बंद ठेवले होते. राष्ट्रीयकृत बँकांनी या भारत बंदच्या हाकेला साथ देत आपले सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेवल्याबाबत सूचनाफलक लावला होता. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व आर्थिक व्यवहार कोलमडले. मात्र, सहकार बँका सुरू असल्याने, त्या माध्यमातून लोकांना त्यांचे आर्थिक व्यवहार करता आले.