भंडारा- लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या झालेल्या नवरदेवाच्या हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे, या तरुणाच्या होणाऱ्या पत्नीनेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रियकराच्या मदतीने हा हत्याकांड घडवून आणले असून पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. मात्र, हत्येशी निगडित बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
गुढ उलगडले; भावी पत्नीनेच केली होती 'नवरदेवाची' हत्या, प्रियकरालाही अटक 6 मे ला तुमसर तालुक्यातील येरली गावातील तरुण विनोद कुंभरे याचा मृतदेह गावशेजारील शेतशिवारात मिळाल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. विनोदचे सात तारखेला लग्न होते. त्याच्या आदल्या दिवशीच त्याची हत्या कोणी आणि का केली, असा प्रश्न कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना पडला होता.
पाच दिवसांनंतर पोलिसांनी विनोदची होणारी पत्नी रीना मडावी (वय 24 वर्ष) आणि तिचा प्रियकर प्रफुल्ल परतेती (वय 26 वर्ष) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रीना हिला विनोदशी लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पाच तारखेला विनोदला रात्री येरली गावाच्याबाहेर बोलावले तिथे आरोपी प्रफुल्ल आपल्या मित्रांसह उपस्थित होता. विनोद पोहोचल्यानंतर त्यांनी त्याची हत्या केली. हत्येनंतर पोलिसांनी सर्वच संभावनांचा विचार करत तपास केला. मात्र, आरोपी कोण याचा शोध लागत नव्हता. शेवटी तिरोडा तालुक्यातील कोयलरी या विनोदच्या सासुरवाडीत गेले असता, तिथे आरोपी प्रफुल्ल आणि रीना यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असता, त्यांनी हत्येची कबूली दिली आहे. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
विनोद हा चंद्रपूर येथे खासगी कंपनीत नोकरीवर होता. त्याचे गावात कोणाबरोबरही वैर नव्हते. त्यामुळे हत्येचे रहस्य उघडणे पोलिसांना एक चॅलेंज होते. मात्र, पोलिसांनी आपली कामगिरी चोखपणे बजावत या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून या हत्याकांडात अजून काही आरोपी असण्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हत्येचा उलगडा जरी झाला असला तरी काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. जर लग्न करायचे नव्ह्ते तर मुलीने लग्नास नकार का दिला नाही, हत्या करण्यापेक्षा प्रियकराबरोबर पळून का गेली नाही, विनोदच्या हत्येमुळे हिचा का फायदा होणार होता, या हत्येत अजूनही कोणी सामील आहेत का या सर्व प्रश्नांचा उलगडा पोलिसांना करायचा आहे.