भंडारा - तुमसर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकावर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. धान शेतीपाठोपाठ भाजीपाला उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
हेही वाचा - मुंबई मेट्रोच्या अश्विनी भिडेंची अखेर उचलबांगडी; त्यांच्याजागी रणजीतसिंग देओल यांची नियुक्ती
अशा परिस्थितीत सरकारकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. तुमसर तालुक्यातील सोरणा, लोहारा, लंजेरा या गावातील शेतकरी धान (भात) पीक निघाल्यानंतर भाजीपाल्याची लागवड करीत असतात. या गावातील शेतकऱ्यांनी सध्या टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. तोडणीला आलेल्या टोमॅटो पिकातून हातात नगदी पैसे येईल, या विचाराने शेतकरी आनंदी होता. मात्र, अचानक टोमॅटोची झाडे वाळू लागली. टोमॅटो गळून खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी हे पीक वाचविण्यासाठी वेगवेगळ्या औषधांची फवारणी केली. या फवारण्यांचा फायदा तर झालाच नाही, उलट खर्चच जास्त झाला.
हेही वाचा - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करून साजरा केला लग्न सोहळा