भंडारा -उन्हाळ्याच्या सुट्ट्यात बाहेर गावी जात असाल तर सावधान..! कारण सध्या आपल्या शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कुलूपबंद असलेल्या घरातील चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणून नागरिकांनी गावी जाताना त्यासबंधीची माहिती पोलिसांना द्यावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. पोलीस विभागाद्वारे संपूर्ण जिल्ह्यात याविषयाचे पत्रक वाटले जात आहेत, तसेच गस्तही वाढविल्या जात आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये नागरिक लग्नकार्यासाठी किंवा फिरायला बाहेर गावी जातात. मात्र, घरात कुणी नसल्याचा फायदा घेत भुरटे चोर कुलूप असलेल्या घरात चोऱ्या करतात. सध्या संपूर्ण भंडारा शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भंडारा शहरातील लक्ष्मीनगर येथील अशोक मस्के यांच्या घरी बुधवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास चोरट्याने डल्ला मारला. अशोक मस्के हे लाखनी येथे कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी घराच्या मागच्या दाराचे कुलूप तोडून कपाटातून सोन्याचे दोन मंगळसूत्र, दोन अंगठ्या व गोफ आणि रोख रक्कम 15 हजार रुपये असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.