भंडारा -मागील वर्षभरापासून भंडारा शहरातील जिल्हा परिषद ते खात रस्त्यावरील पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. या मार्गावर नवीन रस्त्यांची निर्मिती झाली असून यासाठी जुने खांब काढून नवीन खांब लावण्यात आले. मात्र, नवीन जोडणी नगरपालिका करेल की कंत्राटदार, या वादामुळे हे पथदिवे गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे बंद आहेत. पथदिवे बंद असल्याने संपूर्ण रस्त्यांवर अंधार असतो आणि त्यामुळे या रस्त्यांवर अपघाताच्याही बऱ्याच घटना घडल्या आहेत.
२ वर्षाआधी भंडारा शहराच्या जिल्हा परिषद चौकापासून नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू झाले होते. हे काम शहरात सुरू असताना खात रस्ता ते जिल्हा परिषद चौक परिसरातील पथदिव्यांची दोन्ही बाजूंची खांबे काढण्यात आली. त्यानंतर दुपदरीकरणाच्या मध्यभागी नवीन खांब बसविण्यात आले. या कामाला आता वर्ष पूर्ण झालं मात्र, अजूनही पथदिवे काही सुरू झाले नाही. खांबे बसविल्यानंतर त्यावर लाईट लागलेत, आवश्यक त्या सगळ्या वायर देखील जोडण्यात आल्या. फक्त त्याच्या विद्युतीकरणाची जोडणी बाकी असून इथेच सर्व प्रक्रिया येऊन थांबली आहे.
रस्त्यांसाठी जुने पथदिवे काढून नवीन पथदिवे कंत्राटदारांनी लावलेत, त्यामुळे ते सुरू करण्याची जबाबदारी ही त्या कंत्राटदाराची असल्याचे नगरपालिका प्रशासनातर्फे कंत्राटदारांना सांगण्यात आले. तर, माझे काम पथदिवे लावून देण्याचे होते ती सुरू करण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची आहे असं कंत्राटदार सांगत आहेत. त्यांच्या याच वादामुळे मागील वर्षभरापासून पथदिवे लावून तयार असले तरी बंद अवस्थेत आहेत.