महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: लॉकडाऊन सापांसाठी पोषक... - भंडारा न्यूज

सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतात आणि खुल्या जागेत पाणी साचले असते. हे पाणी सापाच्या बिळात जाते त्यामुळे साप बिळातून बाहेर निघतात. पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी साप सुरक्षित जागा शोधतात. त्यामुळे घरात किंवा इतर सुरक्षित स्थळी ते आसरा घेतात. स्वयंपाक घर किंवा पोकळ असलेल्या घरातील जागेत ते बस्तान मांडतात.

snakes-are-found-in-large-numbers-in-lockdown-at-bhandara
लॉकडाऊन सापांसाठी पोषक...

By

Published : Jul 28, 2020, 7:55 PM IST

भंडारा- जिल्ह्यात जून आणि जुलै या काळात मोठ्या प्रमाणात साप आढळत आहेत. हे साप नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात साप आढळून आलेले आहेत. या सर्व सापांना सर्पमित्रांनी आणि वनविभागाच्या रेस्क्यू टीममने पकडले आहे. मात्र, या महिन्यात साप का आढळून येत आहेत याबाबतचा हा विशेष रिपोर्ट.

लॉकडाऊन सापांसाठी पोषक...

2020 च्या मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले. तसेच चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा वावर कमी झाला, कारखाने बंद झाले आणि या सर्वांचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे प्रदूषण कमी झाले. स्वच्छ वातावरण, नागरिकांची, वाहनांची रेलचेल रस्त्यावरील कमी रेलचेल यामुळे या काळात साप बिळातून बाहेर पडले. त्यामुळेच या कालावधीत नागरिकांना आणि सर्पमित्रांना सर्वात जास्त सापांचे दर्शन झाले. तसेच रोड अपघातात साप मरण्याची संख्याही कमी झाली आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतात आणि खुल्या जागेत पाणी साचले असते. हे पाणी सापाच्या बिळात जाते त्यामुळे साप बिळातून बाहेर निघतात. पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी साप सुरक्षित जागा शोधतात. त्यामुळे घरात किंवा इतर सुरक्षित स्थळी ते आसरा घेतात. स्वयंपाक घर किंवा पोकळ असलेल्या घरातील जागेत ते बस्तान मांडतात. वर्ष भराच्या तुलनेत पावसाळ्यात तिप्पट साप आढळतात असे सर्पमित्रांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्यात चार विषारी सापांच्या प्रजाती आढळतात. नाग, घोणस, मण्यार, फुरसे, या प्रजाती भंडाऱ्यात आहेत. यातील फुरसे जातीचा साप हा दुर्मिळ आहे. साकोली तालुक्यातील काही भागांमध्ये या सापाचे अस्तित्व आढळून आले आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात आढळणारे सर्व प्रजातीचे साप हे बिनविषारी किंवा निमविषारी आहेत. जुलै महिन्यात घोणस जातीच्या मादीने 59 पिल्लांना सर्प मित्राच्या घरी जन्म दिला. तर एका घरात नागाच्या 12 पिल्लांना सर्पमित्रांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडल्याचा घटना घडल्या आहेत.

जिल्ह्यात आढळणाऱ्या चार विषारी सापांमध्ये दोन प्रकारचे विष आहे. न्यूरॉटॉक्सिक आणि दुसरे हेमोटॉक्सिन. कोब्रा आणि मण्यारमध्ये न्यूरॉटॉक्सिक विष असते. हे साप चावल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, मेंदूवर प्रभाव जाणवतो, डोळे बंद होतात. तर घोणस किंवा फुरसे यामध्ये हेमोटॉक्सिन विष असते. हा साप चावल्यास रक्तपेशींवर प्रभाव पडतो. यामुळे चावलेल्या ठिकाणी मोठी सूज येते, लघवी लाल रंगांची होते, उलट्या येतात.

बहुतांश वेळा साप चावल्यानंतर लोक हे भीतीमुळे मृत्यू पावतात. जिल्ह्यात आढळणाऱ्या या चार सापा व्यतिरिक्त इतर सर्व साप बिनविषारी आहेत. मात्र साप चावल्यावर नागरिक डॉक्टरांकडे न जाता मांत्रिकाकडे जाऊन उपचार घेतात. तो साप बिनविषारी असल्याने तो व्यक्ती सहाजिकच मांत्रिकाकडे बरा होतो. साप चावल्यानंतर मनात भीती न बाळगता डॉक्टरांकडे जावे त्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार होतील.


साप हा निसर्गातील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे तो दिसल्यावर त्याला मारण्यापेक्षा वन विभाग किंवा सर्पमित्रांना बोलवावे. वन विभागाच्या 1926 या हेल्पलाईन नंबर फोन केल्यास वन विभागाची रेस्क्यू टीम जाऊन सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडते. त्यांना शक्य नसल्यास त्यांनी नोंदणीकृत केलेल्या सर्पमित्रांना सांगून त्या सापाची सुटका केली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details