भंडारा- सीतासावंगी वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची हत्या करणाऱ्या टोळीला अटक करण्यात वन विभागाला यश आले आहे. टोळीकडून वाघाचे कातडे, २४ नखे, ७ चितळाचे शिंग आणि रानडुक्कराचे मांस जप्त करण्यात आले आहे. तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेले हत्यारे आणि साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना ५ जूनपर्यंत वनकोठडीत ठेवण्यात येणार आहे.
२८ जूनला मनीराम आनंदराम गंगबोयर (राहणार सितासावांगी तालुका तुमसर) यांनी शब्बीर बाबू (राहणार, सीता सावंगी) यांच्या शेतामध्ये शिव मदन कुंभरे (राहणार सितासावांगी) यांच्या मदतीने विद्युत प्रवाह लावून शिकार केली होती. शिकारीनंतर वाघाचे कातडे काढून उर्वरित सांगाडा आरक्षित वन क्रमांक ६५ सीता सावंगी येथे खड्डा खोदून पुरण्यात आला होता.
नाका डोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी २ सहकाऱ्यांसह मनीराम यांच्या घरी झडती घेतली. यावेळी त्यांच्या घरी वाघाचे कातडे आढळून आले. मनीराम यांच्या घरी वाघाच्या कातडे, ७ चितळाचे शिंगे आणि रानडुकराचे शिजलेले मांस जप्त करण्यात आले. तर, शिवदास कुंभरे यांच्या घरातून शिकारीकरिता वापरण्यात आलेल्या वस्तू यामध्ये सेंट्रींग तार, बांबूच्या खुंट्या तसेच शिजविले रान डुकराचे मांस जप्त करण्यात आले. या मांसापैकी काही मांस त्यांनी विजय सुंदरलाल पारधी (राहणार गूडरी) आणि त्यांचे मित्र रवींद्र किशन रहांगडाले (राहणार गोबरवाही) यांना विक्री केले होते. २९ जूनला मनीराम गंगबोयर यांच्या घरी वन विभागाने पुन्हा झडती घेतली. यावेळी त्यांच्या घरातून वाघाची २२ नखे आणि २ बिबट्यांची नखे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी वनविभागाने ६ आरोपींना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सदर आरोपींना ५ जुलैपर्यंत वनकोठडीत ठेवण्याची परवानगी दिली आहे. याप्रकरणी वनविभागाचा तपास सुरू आहे.