महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बचत गटाच्या महिलांना मिळाले हक्काचे विक्री केंद्र, खऱ्या अर्थाने होत आहेत स्वावलंबी - भंडारा महिला बचत गट

ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महिला बचत गटांची निर्मिती केली जात आहे. या बचत गटातील महिलांना वेगवेगळ्या वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर या महिला त्या वस्तूंची निर्मिती करतात. मात्र, उत्पादित मालाची विक्री कुठे व कशी करावी ही अडचण महिलांना नेहमीच येत होती...

भंडारा
भंडारा

By

Published : Nov 12, 2020, 9:37 PM IST

भंडारा- जिल्ह्यातील महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत नगरपरिषद, भंडाराने आधार शहर उपजीविका केंद्र सुरू करून या महिलांच्या वस्तूंना विक्रीसाठी जागा निर्माण करून देऊन खऱ्या अर्थाने या महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने मदत केली आहे.

बचत गटाच्या महिलांना मिळाले हक्काचे विक्री केंद्र, खऱ्या अर्थाने होत आहेत स्वावलंबी
37 गटाच्या महिलांचे उत्पादित वस्तू विक्रीसाठी उपलब्धग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महिला बचत गटांची निर्मिती केली जात आहे. या बचत गटातील महिलांना वेगवेगळ्या वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर या महिला त्या वस्तूंची निर्मिती करतात. मात्र, उत्पादित मालाची विक्री कुठे व कशी करावी ही अडचण महिलांना नेहमीच येत होती. यावर उपाय शोधत शासनाने दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान सुरू केले आणि या अभियानांतर्गत भंडारा नगरपालिकेच्या माध्यमातून आधार शहर उपजीविका केंद्र निर्माण केले गेले.

या केंद्रामध्ये भंडारा जिल्ह्यातील 37 महिला बचत गटाच्या वस्तूंची विक्री केली जात आहे. महिला बचत गटातील उत्पादित वस्तूंची विक्री बहुतांश वेळा घरूनच व्हायची. मात्र, आता या महिलांना उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादित मालाची मागणी वाढली आहे. आम्ही उत्पादित केलेल्या वस्तू घरूनच विकल्या जायच्या, त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक मिळत नसत. मात्र, या केंद्रात वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री लावल्यापासून आमच्या वस्तूंची मागणी वाढली असल्याचे बचत गटाच्या महिलांनी सांगितले.

दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तू उपलब्ध

विक्री केंद्रांवर सध्या दिवाळीनिमित्त लागणारे दिवे, पणत्या, आकाश दिवे, या वस्तूसुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच दिवाळीच्या फराळाचा ऑर्डर मिळाल्यास या महिला बचत गटांच्या माध्यमातून ताजा फराळ बनवून दिला जातो. यासह महिलांनी बनविलेल्या कापडी बॅग, फॅन्सी दागिने, विविध मूर्ती, तांब्याचे भांडे, लोणचे, पापड, आकाश दिवे आणि घरातील सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या या वस्तूंची विक्री करण्यासाठी या केंद्रांवर शासनाचे कर्मचारी आणि अधिकारी राहतात. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू या केंद्रावर आणून द्यायच्या आहेत. त्याची विक्री करण्याची सर्वस्वी जबाबदारी या केंद्रातील कर्मचाऱ्यांची असते. विक्री झालेल्या वस्तूंपैकी दहा टक्के रक्कम कपात करून उर्वरित 90 टक्के रक्कम ही महिला बचत गटाच्या खात्यावर जमा केली जाते. केंद्रामुळे महिलांच्या विविध वस्तूंना ग्राहक मिळाले असून त्यांच्या उत्पादनाला मागणी वाढली आहे, असे या केंद्राच्या व्यवस्थापकांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details