भंडारा - राज्य परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन विभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
राज्य परिवहन विभागीय प्रशासनासोबत अनेकदा सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या १८ मागण्यांसाठी विविध वेळा चर्चा केली. मात्र, अजूनही राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नसल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. त्याचाच निषेध म्हणून गुरुवारी विभागीय परिवहन अधिकारी यांच्या इमारतीच्या परिसरात या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले होते.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या या मागण्यांमध्ये विधवा/ विधुर यांना मोफत प्रवास पास देताना त्यांचे वय ७५ वरून ६५ करण्यात आले आहे. वास्तविक पाहता सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या पत्नी/ पती यांना वयाची अट नाही. तसेच विधवा /विधुर यांनाही ही अट ठेवण्यात यावी व त्यांनादेखील ६ महिन्यांचा पास देण्यात यावा. सध्या साध्या बसेस बऱ्याच मार्गावर धावत नाही, तेव्हा निमआराम आणि तत्सम सर्व गाड्यांवरही मोफत प्रवास पास सवलत देण्यात यावी. मोफत प्रवास पासची मुदत जानेवारी ते डिसेंबर अशी असावी. मोफत प्रवास पासची सवलत ६ महिने अनुज्ञेय आहे. ती जानेवारी ते फेब्रुवारी आणि सप्टेंबर ते डिसेंबर अशी ठेवण्यात यावी. राज्य परिवहन अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या जवळच्या कार्यालयातूनच मोफत प्रवास पास घेऊ शकतात, हा प्रवास पास प्रत्येक जिल्ह्यातून मिळण्याची सुविधा द्यावी.