भंडारा : गणेशपूर येथील 45 वर्षीय मनोरुग्ण महिला ही तिच्या भावाच्या घरी राहत असे. घटनेच्या दिवशी 28 एप्रिलला ती सायंकाळी घरी न गेल्याने तसेच परिसरात कुठेही दिसत नसल्याने कुटुंबीयांनी ३० तारखेला ती हरविल्याची तक्रार दिली. पोलिसांना तक्रार मिळताच तपास सुरू करण्यात आला. ३० तारखेला दुपारी ३ च्या दरम्यान ही महिला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या निर्जन स्थळी विवस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सुरक्षा भिंतीच्या पायथ्याशी आढळली. पोलिसांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत या महिलेवर अत्याचार झाल्याचे समोर आले; मात्र ती महिला काहीही सांगण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलिसांनी आपले तपासाचे चक्र वेगळ्या दिशेने फिरविले.
आरोपीने सांगितले सत्य: परिसरातील सर्व सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता एक ऑटो रिक्षा (MH-36-H-4977) हा सायंकाळी साडेसात वाजता स्मशानभूमीकडे जाताना दिसला. तो रात्री साडेबारा वाजेला परत येताना दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. या आधारे संबंधित ऑटोचालकास अटक करून त्याची चौकशी केली असता सत्य समोर आले. घटनेच्या दिवशी आरोपीने महिलेला गणेशपूर परिसरातून आपल्या ऑटोमध्ये बसविले. त्यानंतर गणेशपूर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निर्जन स्थळी महिलेला नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर त्या महिलेला निर्वस्त्र अवस्थेत सोडून आरोपी ऑटोसह घटनास्थळावर पसार झाला.