महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ते' करत आहेत कॉकरेल कोंबड्यांना मुक्त संचार पद्धतीने जगवण्याचा प्रयत्न - कुक्कुटपालन व्यवसाय भंडारा

सामान्यपणे गावरान कोंबड्यांना मुक्त संचार पद्धतीने वाढवले जाते. मात्र, संजय एकापूरे या व्यावसायिकाने कॉकरेल प्रजातीच्या कोंबड्यांना मुक्त संचार पद्धतीने जगवण्याचा प्रयत्न केला आहे. कोंबडी खाल्ल्याने कोरोनाची लागण होते, या अफवेमुळे संकटात आलेल्या व्यावसायिकांसाठी ही आशादायी गोष्ट आहे.

cockerel hen
कॉकरेल कोंबड्या

By

Published : Mar 15, 2020, 2:14 PM IST

Updated : Mar 15, 2020, 3:14 PM IST

भंडारा - कोरोना विषाणूची लागण चिकनमुळेही होतो या अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला आहे. काही व्यावसायिकांनी कोंबड्या आणि अंड्यांची विल्हेवाट लावली, काहींनी अगदी शुल्लक दरात विकल्या आणि काहींनी तर मोफत विकल्या. मात्र, भंडारा जिल्ह्यातील एका कुक्कुटपालन व्यावसायिकाने या परिस्थितीवर मात करण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली. पूर्णतः विक्रीस आलेल्या मात्र, तरीही विक्री न झालेल्या कोंबड्यांचा होणारा खाद्य खर्च कमी करण्यासाठी या कॉकरेल प्रजातीच्या कोंबड्या शेड बाहेर चरण्यासाठी काढल्या आहेत.

कॉकरेल कोंबड्यांना मुक्त संचार पद्धतीने जगवण्याचा प्रयत्न

भंडारा तालुक्यातील जाख गावात मागील दोन वर्षांपूर्वी संजय एकापुरे यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. आत्तापर्यंत त्यांना या व्यवसायातून पुष्कळ नफा मिळाला. मात्र, कोंबडी खाल्ल्याने कोरोनाची लागण होते, या अफवेमुळे त्यांना आता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यांच्याकडे असलेल्या आठ हजार कोंबड्यांची विक्री झाली नाही.

हेही वाचा -शासनाच्या आदेशाला निवडणूक विभागानेच दाखवली केराची टोपली

एकापूरे यांनी कमी दरात कोंबड्या विकण्यासाठी जाहिराती दिल्या. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. 8 हजार कोंबड्याना जगवण्यासाठी दररोज 12 ते 14 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी या कोंबड्यांना शेड बाहेर काढून मोकळ्या जागेत खाद्य खाण्यासाठी सोडले. दिवसभर बाहेर ठेवल्यानंतर या कोंबड्यांना रात्री पालक, मेथी, कोथिंबीर, टोमॅटो यासारखा भाजीपाला खाण्यासाठी दिला जातो. यासाठी त्यांना फक्त 2 हजार रुपये खर्च येत आहे.

तीन रुपयांचे पिल्लू खरेदी करून त्याला 60 दिवसांमध्ये 800 ते 900 ग्रॅम पर्यंत मोठे करावे लागते. यासाठी 80 ते 90 रुपये खर्च येतो. संजय एकापूरे यांच्याकडे 8 हजार कॉकरेल प्रजातीच्या कोंबड्या आहेत. त्यांच्या विक्रीतून 10 लाख 40 हजार उत्पन्न मिळेल आणि त्यासाठी त्यांना 7 लाख 20 हजार रुपये खर्च आवश्यक आहे. नियोजित खर्च वजा केल्यास 3 लाख 20 हजार रुपये निव्वळ नफा मिळेल. मात्र, सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

सामान्यपणे गावरान कोंबड्यांना अशा मुक्त संचार पद्धतीने वाढवले जाते. कॉकरेल प्रजातीच्या कोंबड्यांना मुक्त संचार पद्धतीने जगवण्याचा पहिलाच प्रयत्न एकापूरे यांनी केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात या व्यवसायातील खाद्याचा खर्च कमी करून जास्त नफा मिळवणे शक्य होईल, असे मत संजय एकापूरे यांनी व्यक्त केले.

Last Updated : Mar 15, 2020, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details