भंडारा - आठवड्याभरापूर्वीच एका हत्येच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला पोलीस विभागाने संरक्षण देत वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची आणि हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सगळ्या विधी पूर्ण करण्याची मुभा दिली. पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीची गावात चर्चा होत आहे.
बेला गावातील एका सराईत गुन्हेगाराची ८ दिवसाआधी त्याच गावातील लोकांनी हत्या केली होती. या हत्येच्या आरोपाखाली ६ लोकांना अटक करण्यात आली होती. या आरोपींपैकी एक बंटी नावाच्या मुलाच्या वडिलांचा बुधवारी मृत्यू झाला होता. मृत्यूची बातमी बंटीपर्यंत पोचतात वडिलांचे अंतिम दर्शन घेऊन अंत्यविधी करण्याची मुभा द्यावी अशी विनंती बंटीने केली. त्याच्या नातेवाईकांनीसुध्दा तसा विनंती अर्ज केला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विचार करत पोलिसांनी सुरुवातीला परवानगी दिली नाही. मात्र, बंटीला वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी घेऊन न गेल्यास एका मुलाला त्याच्या हक्कापासून दूर ठेवले जाईल. हा विचार खाकी वर्दीतील अधिकार्यांच्या डोक्यात येताच त्यांनी तातडीने न्यायालयाची परवानगी घेत सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता केली. नंतर पोलीस बंदोबस्तात बंटीला त्याच्या गावात नेवून हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधीचे सर्व सोपस्कार पूर्ण होईपर्यंत बंटीला सुरक्षा प्रदान केली.