महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhandara Crime News : अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे उलगडले रहस्य; जुन्या वादातून आवळला तरुणाचा गळा, दोघांना अटक - Police

लाखनी तालुक्यातील परिसरात एक अर्धवट जळालेला तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली आहे. जुन्या वादातून दोन आरोपींनी नागपूर येथील मोहम्मद तन्वीरचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Bhandara Crime News
माहिती देताना पोलीस अधीक्षक रोहीत मतानी

By

Published : Apr 22, 2023, 8:25 AM IST

भंडारा :लाखनी तालुक्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटली असून दोन आरोपींना अटक करण्यात भंडारा पोलीस विभागाला यश आले आहे. हा मृतदेह नागपूर येथील मोहम्मद तन्वीर अब्दुल रज्जाक शहा या तरुणाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी नागपूरच्याच दोन तरुणांनी तन्वीरचा खून करून त्याचा मृतदेह जाळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मोहम्मद तन्वीर हा नागपूर शहरातील मुदलियार ले-आउट, शांतीनगरात राहणारा होता. या प्रकरणी अतिक लातिफ शेख आणि फैजन परवेज खान या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

अर्धवट जळालेला आढळला होता मृतदेह :भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात १३ एप्रिलला गडेगाव वनविभागाच्या परिसरात एक अर्धवट जळालेला मृतदेह पोलीस पाटलांना आढळून आला होता. याबाबतची माहिती त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. या मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता, मात्र कमरेखालील भाग शाबूत होता. त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा हे ओळखणे त्यावेळेस कठीण होते. त्या मृतदेहाजवळ ओळख पटेल असे कोणतेही पुरावे नव्हते. त्यामुळे या घटनेतील मारेकऱ्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान होते.

कुटूंबियांनी ओळखला मृतदेह :मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ राज्यातील सर्व मिसिंगच्या तक्रारी तपासल्या. यात नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर येथील तन्वीर अब्दुल रज्जाक शहा हा ६ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. तन्वीरच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता, त्यांचा मुलगा सहा एप्रिलपासून बेपत्ता झाल्याचे असे त्यांनी सांगितले. अर्धवट जळालेला मृतदेह हा आमच्या मुलाचा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यावेळी नातेवाईकांनी अतिक लातिफ शेख ( वय 29 वर्ष, शांतीनगर, नागपूर ) आणि फैजन परवेज खान ( वय 18, बिहाड, ता. हिंगणा ) या दोन जणांवर त्यांनी संशय व्यक्त केला.

गळा आवळून गाडीतच केला तन्वीरचा खून :तन्वीरच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली. मात्र यावेळी या दोघांनीही माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी अधिक विश्वासात घेत माहिती विचारल्याने या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी आरोपी अतीक शेखने त्याचा भाचा फैजन खानच्या मदतीने तन्वीरला गड्डी गोदाम परिसरातून इंडिका गाडीतून किडनॅप केले. त्यानंतर आरोपी अतिक व फैजन यांनी मिळून गळा आवळून गाडीतच त्याचा खून केला. या हत्येचा पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुका गाठला. महामार्गावरून 200 मीटर अंतरावर गळेगाव येथील वनविभागाच्या लाकूड आगारात तन्वीरला डिझेल टाकून तिथून पसार झाले.

रमजान महिन्यातच झाली मारामारी :आरोपी आतिफचा मृत तन्वीरशी 2017 पासून वाद सुरू होता. रमजानच्या पहिल्या आठवड्यात या दोघांमध्ये पुन्हा एकदा हाणामारी झाली. तन्वीर आपला खून करेल अशी भीती आतिफच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच आतिफने तनवीरला संपवण्याचा कट रचला. अर्धवट जळालेला मृतदेह तन्वीरचा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तरी पूर्ण खात्री करण्यासाठी मृतदेहाचा डीएनए फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तो त्याच्या पालकांच्या डीएनएसोबत जुळवल्या जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रोहीत मतानी यांनी दिली. दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भांदवी कलम 302, 201 सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Bus Truck Accident : लखनौ गोरखपूर महामार्गावर बसची ट्रकला धडक, 7 ठार, 40 जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details