भंडारा- केंद्र सरकारच्या आयुध निर्माणीच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध भंडारा येथील आयुध निर्माणी कामगारांनी परिवारासह एल्गार रॅली काढली. या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध २० ऑगस्टपासून १९ सप्टेंबरपर्यंत कामबंद आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित एल्गार रॅली काढण्यात आली.
खासगीकरणाविरुद्ध भंडारा आयुध निर्माणी कामगारांची परिवारासह एल्गार रॅली मागील महिन्यात केंद्र सरकारने देशातील ४१ आयुध निर्माणी कारखान्याचे खासगीकरण करण्याचे निर्णय घेतले. त्याची अंमलबजावणी सुरू करण्याच्या अगोदरच या निर्णयाला देशभरातील सर्व आयुध निर्माणी कारखान्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला विरोध दर्शवत आहेत. हा विरोध दर्शवण्यासाठी विविध प्रकारे आंदोलने आणि मोर्चे काढले. मात्र, याचा शासनावर कोणताही परिणाम झाला नाही.
भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर आयुध निर्माणी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सरकारच्या हुकूमशाही आणि हिटलरशाही धोरणाविरुद्ध सोमवारी रॅलीचे आयोजन केले होते. सकाळी परिसरातील शॅडल पॉईंटपासून या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये विविध संघटना बीपीएमएस, आयएनटीयुसी, एआयडीएएफचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी आपल्या परिवारासह रॅलीत निघाले. महिला व बालकांनी हातामध्ये विविध संघटनेचे ध्वज लाल, भगवा, निळा, तिरंगा आणि मागण्या घेऊन भाजप सरकारच्या या खासगीकरणाच्या निर्णयाचा निषेध करत शासनाविरुद्ध घोषणा केल्या.
ही रॅली जवाहरनगर वसाहतमधून पुढे जात मुख्य मार्केट यार्डपर्यंत पोहोचली. त्यानंतर या रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले. सभेला संघटनेच्या विविध अधिकाऱ्यांनी संबोधित केले. २० ऑगस्टपासून १९ सप्टेंबरपर्यंत काम बंद संप सुरू होणार आहे. या आयुध निर्माणी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. आता ही सुरक्षाच भाजप सरकार खासगी लोकांच्या हातात देऊ पाहत आहे. हे शासन मोठ्या उद्योगपतींच्या हातातील खेळणे बनले आहे. जोपर्यंत खाजगीकरणाचा हा निर्णय भाजप सरकार मागे घेणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला.