भंडारा - लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील रहिवासी पुष्पा आत्माराम उके (५०) मादी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या मुलगी प्राजंली उके (१९) हिच्यासोबत शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जंगलात सरपण आणण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली.
भंडारा : अस्वलाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, आर्थिक भरपाई देण्याची गावकऱ्याची मागणी - पुयार गाव
भंडाऱ्यामधील लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील रहिवासी पुष्पा आत्माराम उके मादी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.
दोघी मायलेकी सरपण गोळा करण्यासाठी गावाला लागूनच असलेल्या जंगलात गेल्या होत्या. यावेळी अचानक मादी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात पुष्पा उके गंभीर जखमी झाल्या. यावेळी त्यांची मुलगी प्रांजली हिने पळ काढून आरडाओरड केली. यानंतर गावातील लोकांनी त्यांना लाखांदूर रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आणि जखमा गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेचा पंचनामा लाखांदूर पोलीस आणि वनविभागाने केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
पुष्पा या विधवा असून अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना मुलगी प्रांजलीची चिंता वाटू लागली आहे. माझ्या मुलीला कोण सांभाळणार, अशी विनवणी त्या रुग्णालयात करत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.