भंडारा - जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. गेल्या सात दिवसात तब्बल 81 रूग्ण आढळले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पुन्हा 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या 179 वर पोहचली आहे. यापैकी 87 रुग्ण बरे झाले असून 90 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.
भंडारा शहर आणि गणेशपुर हे दोन ठिकाण कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. मे महिन्यात भंडारा जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर 7 जुलैपर्यंत 98 रुग्ण जिल्ह्यात आढळले होते. मात्र, गेल्या 8 तारखेपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 8 ते 14 जुलै या दरम्यान 81 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत लागोपाठ दोन दिवसात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही तरुणांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसून हे दोन्ही भंडारा शहरातील आहेत.
दोन्ही तरुणांना कोणापासून कोरोनाची बाधा झाली, हा विषय सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. रविवारी आणि सोमवारी मृत्यू पावलेल्या रुग्णांचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये भंडारा शहरातील जफर खान यांच्या घरापासून ते नदीम खान यांच्या घरापर्यंत तसेच मझहर पटेल यांच्या घरापासून ते सौदागर मोहल्ला मशिदपर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
दुसरा कंटेनमेंट झोन हा गणेशपूर येथील असून बुद्ध विहार (श्री खोपडे यांचे घर) येथून ते श्री कापसे यांच्या घरापर्यंत, श्री कापसे यांचे घर ते श्री एकनाथ खोब्रागडे यांच्या घरापर्यंत, तसेच सार्वजनिक विहीर ते रतिलाल नागदेवे यांचे घरापर्यंत, श्री मृणाल खोब्रागडे यांचे घरापासून ते अनिल तिरपुडे यांचे घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
मंगळवारी मिळालेल्या 5 रुग्णांमध्ये तुमसर तालुक्यात मुंबईवरून आलेली 24 वर्षीय महिला, हैदराबाद वरून आलेला 41 वर्षीय पुरुष आणि हाय रिक्स कॉन्टॅक्टमध्ये असलेला 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर पवनी तालुक्यात बिहारवरून आलेला 28 वर्षीय पुरुष आणि सुरतवरून आलेल्या 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.