भंडारा-राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या धान खरेदीत विलंब केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना सुनावले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
उन्हाळी धान खरेदी १ मे पासून सुरू करण्याचे शासनाचे निर्देश असताना महिना झाला तरी धानाची खरेदी पूर्ण झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना धानाचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही गंभीर बाब आहे. पावसाळा सुरू होण्यास फक्त आठ दिवस राहिले आहेत, तत्पूर्वी जिल्ह्यातील सर्व धान खरेदी पूर्ण करून शेतकऱ्यांना चुकारे देण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
जिल्ह्यात एकूण 90 धान खरेदी केंद्र मंजूर असून फक्त 45 धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याचा खुलासा सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्याचा फायदा कसा होईल याचा विचार करुन शेतकऱ्याचे धान वेळेतच खरेदी करण्यात यावे. धानाचे मिलींग करुन धान खरेदीला गती देण्यात यावी.
१ मे पासून धान खरेदी सुरू करुन आज महिना झाला तरी धानाची खरेदी पूर्ण झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना धानाचे पैसे मिळाले नाही. ही गंभीर बाब असून जिल्हाधिकारी यांनी याची दखल घ्यावी, असे ते म्हणाले. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करण्यात येणार नाही. पावसाळ्यापूर्वी धान खरेदी झाली नाही तर आधीच लॉकडाऊनमूळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास आणखी संकटात टाकू नका, असे नाना पटोले म्हणाले.
जिल्ह्यात 14 हजार 814 शेतकऱ्यांना 11 कोटी 38 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधील 7 हजार 183 शेतकऱ्यांना 29 कोटी 56 लाखाचे कर्ज मिळणे बाकी आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना मधील 8 हजार 848 शेतकऱ्यांना 26 कोटी 9 लाख 58 हजार रुपयांचे कर्ज माफी अजून व्हायचे आहे. त्यामुळे उद्दिष्ट वाढणार आहे, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महाव्यवस्थापक संजय बरडे यांनी सांगितले. यावर 30 जून पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.
जिल्ह्याला 260 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 133 कोटी रुपये कर्ज वाटप 28 हजार 28 शेतकऱ्यांना करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे कर्ज वाटपास उशिर झाला, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महाव्यवस्थापकांनी सांगितले. ही अडचण शक्य तितक्या लवकर दूर करा, असे पटोले यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा संथ झाली आहे. कोरोनाचे नाव सांगून रुग्णांना नागपूर येथे पाठविण्यास येते. वारंवार सूचना देऊनही गर्भवती महिलांना सुध्दा तालुका व जिल्हास्तरावर उपचार मिळत नाही, ही जिल्ह्याची अवस्था असल्याचे पटोले म्हणाले. जिल्हा या सर्व त्रासदीपासून मुक्त कसा होईल, याकडे प्रशासनाने गांर्भियाने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यात लक्ष घालावे, असे ते म्हणाले.