भंडारा -दोन दिवसांपूर्वी झालेल्या वाळू टिप्परच्या धड़केत गर्भवती महिलेच्या अपघाती निधनानंतर भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना जाग आली आहे. आमदारांनी मांडवी-वडेगाव येथील रिढी वाळू घाटावर महसूल तसेच पोलीस प्रशासनासह भेट देत शेतात साठविलेल्या वाळूवर जप्तीची कारवाई करण्याच्या सूचना भोंडेकर यांनी दिल्या आहेत.
भंडाऱ्यात अवैध वाळू साठ्यावर कारवाई वाळू माफियांनी शेतकऱ्यांना घेतले हाताशी -
भंडारा जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत तरीही वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. यासाठी या वाळू तस्करांनी नदीकाठावरील शेतकऱ्यांना हाताशी घेतलेले आहे .दररोज शक्य तेवढ्या ट्रॅक्टर द्वारे नदीतून वाळू उपसा करून नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या शेतात हा वाळूचा साठा केला जातो. त्यानंतर या साठ्यातून ट्रक आणि टिप्पर द्वारे अवैध वाहतूक करून त्याची अवैध विक्री केली जाते. एखाद्या वेळी शासकीय कार्यवाही झाल्यास ही वाळू जप्त केली जाते.
मोठ्या राजकीय लोकांचा आशीर्वाद, आमदारांचा आरोप -
दोन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर भंडारा-पवनी क्षेत्रातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शुक्रवारी खनिकर्म अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांच्यासह शेतीतील असलेल्या वाळू साठ्यावर धाड घालत हा वाळू साठा जप्त करून कार्यवाही करण्यास सांगितले. कारवाईसाठी गेलेल्या आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मांडवी- वडेगाव क्षेत्रात नदीकाठावरील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाळूचे मोठमोठे साठे आढळून आले. हे साठे पाहून स्वतः आमदार आणि अधिकारी अचंबित झाले. वाळू माफियांसह ज्या शेतकऱ्यांनी त्याची शेती वाळू साठ्यासाठी दिली आहे त्यांच्यावरही कार्यवाही करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वाळूमाफियांची एवढी हिम्मत केवळ राजकीय लोक त्यांच्या पाठीशी असल्यामुळे होत आहे, असा आरोप यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला.