भंडारा- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे अनेक कामगार वेगवेगळ्या ठिकाणी अडकून आहेत. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातून मध्यप्रदेशला चालत निघालेल्या एका कामगाराचा भंडारा जिल्ह्यातील सोकोली तालुक्यात मृत्यू झाला.
मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील अतरी गावात राहणारा धर्मपाल दुबे पाचे( वय 55 वर्षे) व्यक्ती पोटाची खळगी भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही गावात मजूरी करत होता. मात्र, संचारबंदीनंतर दोन वेळच्या जेवणाचीही अडचण भासू लागली. मजुरांनी जिथे आहात तिथेच राहावे, आम्ही तुमच्या जेवणाची व्यवस्था करू राहण्याची व्यवस्था करू, असे शासनाने दिले. धर्मपाल सुद्धा होता त्या ठिकाणी नऊ दिवस राहिला. मात्र, दररोज निर्माण होत असलेल्या अडचणीमुळे जगावे की मरावे हाच प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला होता. शेवटी 1 एप्रिलला त्याने परत मध्यप्रदेशला त्याच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.
1 एप्रिलला धर्मपाल, त्याचा मुलगा, सून आणि तीन वर्षांची नात तसेच गावातील इतर 6 सहकारी मिळून सिंदेवाही वरून मध्यप्रदेशला जाण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला. ही पायपीट करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिलच्या रात्री त्यांनी साकोली तालुक्यातील सानगडी हे गाव गाठले. मात्र, तिथे शासकीय सेंटरमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्याने ते सेंदुरवाफा येथे पोहोचले.