भंडारा- जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयावर शुक्रवारी (दि. 3 जाने.) भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह टाळे ठोको आंदोलन केले. संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा खरेदी केंद्राचे गोदामे भरल्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडले आहेत आणि अवकाळी पावसात ते धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गोदामातील धानाची मिलिंग करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली.
1 नोव्हेंबरपासून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक आल्यामुळे आणि खरेदी केद्रांची संख्या कमी असल्यामुळे उपलब्ध असलेले सर्व धान खरेदी केंद्राचे गोदामे पूर्णपणे भरले. गोदाम भरले असल्यामुळे शेतकऱ्याचे धान उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. हजारो क्विंटल धान उघड्यावर ठेवण्यात आल्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने यापैकी बराच धान ओला झाला, ओला झालेला हा धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
हेही वाचा - अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, हजारो क्विंटल धान भिजले