भंडारा - राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात भंडारा जिल्ह्यातील शहापूर आणि सिल्ली गावातील एकूण 240 शेतकऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत नाव आसलेल्या शेतकऱ्यांनी आपला आनंद व्यक्त करताना; डोक्यावरील कर्ज संपल्यामुळे शेतीत नव्या जोमाने काम करू, अशी प्रतिक्रिया दिली.
भंडारा जिल्ह्यात एकूण 35 हजार 325 लाभार्थ्यांची माहिती शासनाला पाठवण्यात आली. सोमवारपासून कर्जमुक्तीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये भंडारा जिल्ह्यातील शहापूर आणि सिल्ली या दोन गावातील 240 शेतकऱ्यांच्या नावांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला. उर्वरित शेतकऱ्यांची यादी 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. कर्जमुक्तीच्या यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना ते नाव प्रमाणित करण्यासाठी बँक व ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सेवा केंद्र जाऊन आधार कार्ड आणि अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. या प्रक्रियेनंतर शेतकरी कर्जमुक्त होऊन त्याचा सातबारा कोरा होणार आहे.
हेही वाचा...कर्जमाफीवर सरकार शेतकऱ्यांना वेड्यात काढतंय -देवेंद्र फडणवीस
शहापूर येथील कर्जमाफी झालेले शेतकरी काशीराम भुरे यांच्याकडे 3 एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी 59 हजार 900 रुपये कर्ज घेतले होते. मात्र, नापिकीमुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. शासनाने त्यांचे कर्ज माफ केल्यामुळे ते आनंदी आहेत. कर्जमुक्त झाल्यामुळे नव्या जोमाने शेती करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.