महाराष्ट्र

maharashtra

भंडारा : वैनगंगेला जलपर्णीचा विळखा, नदीच्या दुतर्फा बनले हिरवे लॉन

By

Published : Aug 6, 2020, 5:35 PM IST

ईकॉर्निया ही जलपर्णी वनस्पती मागील पाच ते सहा वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात दिसत आहे. सध्या भंडारालगत असलेल्या वैनगंगेच्या पुलाखाली या वनस्पतीने आच्छादन मांडले असल्याने नदीला लॉनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्यावर्षी या वनस्पतीच्या निर्मूलनासाठी शासनातर्फे 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, वर्षभरात प्रशासनाने काहीही केलेले दिसत नाही.

वैनगंगेला जलपर्णीचा विळखा
वैनगंगेला जलपर्णीचा विळखा

भंडारा : शहराच्या जवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीमध्ये ईकॉर्निया म्हणजेय जलपर्णी या वनस्पतीचा प्रादुर्भाव अतिशय वाढला आहे. त्यामुळे या नदीवर लॉन तयार केला की काय, अशी शंका पुलावरून जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. या वनस्पतीमुळे पाणी दूषित होत असून एका वर्षाअगोदर याचा नायनाट करण्यासाठी शासनातर्फे 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, अजून तरी हे पैसे फाईलमध्येच आहेत.

ईकॉर्निया ही जलपर्णी वनस्पती मागील पाच ते सहा वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात दिसत आहे. पाण्यावर अलगत तरंगणारी ही वनस्पती हवेच्या दिशेने आणि पाण्याच्या प्रभावाने वाहत जाते. गोसे धरण निर्मितीनंतर पाणी धरणात थांबविले गेले आणि त्यामुळे ही वनस्पती धरणाजवळ अडकून पडली. या वनस्पतीच्या वाढण्याची गती ही अतिशय जास्त असल्यामुळे सुरुवातीला काही प्रमाणात असलेली ही ईकॉर्निया आता जवळपास वीस ते तीस किलोमीटर अंतरावर पसरलेली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर ही वनस्पती मोठ्या प्रमाणात दूरवरून वाहून येते. सध्या भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलाखाली या वनस्पतीने आच्छादन मांडले असल्याने नदीला लॉनचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ही वनस्पती एवढ्या दाटीवाटीने एकत्रित राहते की ज्यामुळे नदीच्या पाण्यामध्ये सूर्यकिरणेही जात नाहीत आणि त्यामुळे नदीच्या पाण्याला उग्र वास येतो. तसेच माशांसाठी लागणारा ऑक्सिजनसुद्धा या वनस्पतीमुळे निर्माण होत नसल्यामुळे जलचर प्राण्यांनाही त्याचा मोठा त्रास होत आहे. दरवर्षी ही वनस्पती वाढल्यानंतर नागरिक त्याची तक्रार प्रशासनाला करतात. मागच्यावर्षी या तक्रारीनंतर भंडारा विधानसभा क्षेत्राचे विधानपरिषद आमदार परिणय फुके यांनी दोन कोटी रुपयांचा निधी या वनस्पतीच्या निर्मूलनासाठी दिला होता. मात्र, मागच्या वर्षभरात प्रशासनाने काहीही केलेले दिसत नाही. त्यामुळे पुन्हा नदीच्या पात्रामध्ये या ईकॉर्निया वनस्पतीने कब्जा केलेला आहे. तर, सध्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही कोरोनाच्या कामात असल्याने सध्या तरी या वनस्पतीपासून नदीला आणि नदीच्या अस्वच्छ पाण्यापासून नागरिकांना सुटका मिळणे कठीण दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details