भंडारा - मी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. पक्षाने आदेश दिल्यास मी नक्की निवडणूक लढवणार असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी दोन-तीन दिवसातच पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मागील काही दिवसांपासून प्रफल्ल पटेल निवडणूक लढवणार नसून त्यांची पत्नी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. शिवाय काँग्रेसचे नाना पटोलेही या जागेवरुन निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र, मी स्वतः निवडणूक लढणार असल्याचे पटेलांनी स्पष्ट करत निवडणूक न लढण्यासंदर्भातल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आम्ही भंडारा-गोंदियासह केंद्रातही जिंकून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी वक्त केला.
मागच्या पाच वर्षापासून मतदार संघातील लोकांच्या मी संपर्कात आहे. मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. त्यामुळे मी माघार येणार असल्याची चर्चा निरर्थक असल्याचेही ते म्हणाले. मी राज्यसभेचा सदस्य आहे. मात्र, त्या सदस्यत्वाचा मी राजीनामा देऊ शकतो. शिवाय माझी पत्नी ही निवडणूक प्रचारात मला नेहमी साथ देते. त्या प्रचार करत असेल तर त्याचा अर्थ त्या निवडणूक लढवणार आहेत असा होत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
पटेलांना चारदा लोकसभेवर पाठवले तरी ते जिल्ह्यात विकास करु शकले नाहीत, अशी टीका त्यांच्यावर विरोधकांकडून केली जाते. त्यावर ते म्हणाले, माझ्यावर टीका करणाऱ्यांनी मागील पाच वर्षात काय केले हे मला सांगावे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार १०० टक्के जिंकेल तसेच केंद्रातही सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास पटेलांनी यावेळी व्यक्त केला.