भंडारा -जिल्ह्यात अजूनही एकही रुग्ण नसल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. मात्र लवकरच भंडारा जिल्हा सुद्धा ऑरेंज किंवा रेड झोन मध्ये येण्यास तयार आहे. हे म्हणायची वेळ आली कारण जिल्हा बंदी असूनही रेड झोन ( नागपूर) मधील लोक सहज भंडारा जिल्ह्यात येत असल्याचे पुढे येत आहे. बुधवारी तर नागपुरातील सर्वात हॉट स्पॉट असलेल्या मोमीनपुरा येथून पती-पत्नी आणि त्यांचा एक मुलगा दुचाकीने भंडारात दाखल झाले. जिल्हा बंदी असूनही नागपूरहून हे दाम्पत्य भंडारा जिल्ह्यत आलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सायंकाळी गावकऱ्यांना या विषयी माहिती मिळताच त्यांनी हे कुटुंब ज्या घरी आले ते घर गाठले व त्यांना रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यासाठी तयार केले. भंडारा जिल्ह्यातील प्रशासन कोरोना बाबत किती गंभीर आहे याची प्रचिती गावकऱ्यांना तेव्हा आली जेव्हा
गावकऱ्यांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास आर. आर. टी. ( Rapid response team ) च्या प्रत्येक व्यक्तीला आणि त्यांच्याकडे उपलब्ध प्रत्येक अधिकाऱ्यांच्या नंबरवरती फोन करून सांगितले. मात्र रात्रीचे 2 वाजेपर्यंत कोणीही त्या गावात पोहचले नाही. दुसऱ्या दिवशी आरोग्य यंत्रणा पोहचली आणि त्या तिघांना जिल्हा रुग्णालयात घेऊन गेली आणि त्या घरातील इतर लोकांना होम क्वारंटाईन केले.