महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिलेवाडा गावात अग्नितांडव, ५ घरांसह जनावरांच्या गोठ्याला आग

आगीत २ बैल आणि २ गाईंचा होरपळून मृत्यू झाला. तर घरातील साहित्य आणि शेतीचे साहित्य जळून खाक झाले.

By

Published : May 4, 2019, 7:59 PM IST

भिलेवाड गावात लागलेली आग १

भंडारा- भिलेवाडा गावात गाईच्या गोठ्यासह ५ घरांना लागलेल्या आगीत ४ जनावरांचा मृत्यू झाला असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी गावकरी मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमुळे लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भिलेवाडा गावात लागलेली आग

भंडारा शहारावरून ७ किमी असलेल्या भिलेवाडा गावात दुपारी अचानक भाजनदास डोळस यांच्या घरच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. आग भडकून शेजारी राहणाऱ्या राजहंस बांडेबूचे यांच्या घराला लागली. उष्णतेमुळे आग अधिकच वाढत गेली. आग पसरून प्राणहंस बांडेबूचे, ज्ञानेश्वर बांडेबूचे, तुळशीराम खवास आणि भोजराज खवास यांच्या घरापर्यंत पोहोचली. आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रुद्र रुप धारण केल्याने, ही आग आटोक्यात येत नसल्याने भंडारानगर पालिकेच्या अग्निशामक गाडीला पाचारण करण्यात आले. २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

आगीत २ बैल आणि २ गाईंचा होरपळून मृत्यू झाला. तर घरातील साहित्य आणि शेतीचे साहित्य जळून खाक झाल्याने भाजनदास डोळस यांचे जवळपास ५ लाखांचे, तर इतर लोकांचे जवळपास २ ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details