भंडारा- जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोलासह कालीसागरा या तीन धरणातून मोठ्या प्रमाणातच पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी वैनगगा नदीला महापूर आला आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे महामार्ग पाण्याखाली गेले आहेत. यापूर्वी २००५मध्ये अशा प्रकारची पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे भोजापूर पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे भंडारा-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच तसेच भंडारा तुमसर रस्तादेखील पाण्याखाली गेला आहे. या पुरामुळे भंडारा शहरातील बऱ्याच भागांमध्ये पाणी शिरले असून सखल भागातील नागरिकांनी घरे पाण्यात असल्याने घराच्या छतावर आश्रय घेतला आहे. एवढेच नाही तर बसस्थानक परिसरही जलमय झाल्याने आणि रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने एस वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे.
शनिवारी भंडारा शहरामध्ये पडणारा पाऊस पूर्णपणे थांबला आहे. मात्र मध्यप्रदेशच्या संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्याच्या पुजारीटोला आणि आणि कालीसागर या धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे वैनगंगा नदी धोक्यापातळी बाहेरून वाहू लागली आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या अनेक भागातील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भंडारा शहराला सर्व बाजूने पाण्याचा वेढा दिला आहे. भंडारा-तुमसर रोडवरील मेहंदी पुलावर चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग 6वर नागपूर नाक्याजवळील भोजापूर नाल्यावर जवळपास 5 फूट पाणी असल्याने भंडारा-नागपूर मार्गही सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
शहरातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वार्ड, टाकळी भगतसिंग वार्ड, सिंधी कॉलनी, गुरुनानक कॉलनी, प्रगती कॉलनी, मेंढा परिसर महात्मा ज्योतिबा कॉलनी, गणेशपूर, भोजापूर परिसर मध्ये या पुराचे पाणी शिरले आहे. प्रगती कॉलनीमधील जवळपास पंधरा ते वीस घर 5 ते 6 फूट पाण्याने वेढलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घराच्या छतावर आश्रय घेतलेला आहे.
भंडारा शहराप्रमाणे, भंडारा ग्रामीण भागातील परिसरात हा पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. तुमसर तालुका आणि पवनी तालुक्यातील ही पुराचे पाणी बऱ्याच गावांमध्ये शिरलेले आहे त्यामुळे या सर्व भागात जनजीवन विस्कळीत झालेला आहे.