भंडारा -सोमवारी साकोलीवरून लाखांदूरला जात असलेल्या काळी-पिवळी प्रवासी गाडीचे टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन चुलबंदब नदीत कोसळली होती. या अपघातात दोन सख्ख्या बहिणींसह 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात एका गरीब बापाच्या प्राध्यापक बनणाऱ्या मुलीचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. तर दोन इतर दोन मुलींचे कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे.
या अपघातात शीतल सुरेश राऊत (वय 12) आणि तिची मोठी बहीण अश्विनी सुरेश राऊत (वय 22) ( दोघीही रा. सानगडी) या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. तसेच सासरा गावातील शितल श्रीरंग कावळे (वय 20), सासरा टोली येथील सुरेखा देवाजी कुंभरे (वय 20) यांचा मृत्यू झाला आहे.
सासरा गावातील शीतल कावळे ही तिची बहिण डिंपल कावळे हिचे कॉलेजमध्ये प्रवेश फॉर्म भरण्यासाठी साकोलीच्या कॉलेजमध्ये गेली होती. सोबत डिंपलची मैत्रिण सुरेखा कुंभरे, शीतल राऊत आणि तिची बहीण अश्विनी राऊत या पाच विद्यार्थिनी एम बी पटेल कॉलेज, साकोली इथे प्रवेशाविषयी चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. गावी परत जाण्यासाठी या प्रवासी गाडीत निघाल्या आणि गाडी पुलावरून खाली कोसळल्याने डिंपल कावळे वगळता इतर चारही मुलींचा जागीच मृत्यू झाला.