भंडारा- मासे चोरण्यासाठी गावातील तरुणांनी चक्क तलावातील पाणी पंपाद्वारे उपसल्याची घटना घडली आहे. यामुळे लाखो मासे मरण पावले आहेत. यामुळे मच्छीमार बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले. त्या तरुणांवर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मच्छी पालन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तशी तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मच्छी पालन संस्थेचे पदाधिकारी
मोहाडी तालुक्यातील कुशारी येथे जिल्हापरिषद लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आहे. मासे पालनासाठी मोहाडी येथील एका संस्थेने हा तलाव पाच वर्षांसाठी लीजवर घेतला आहे. या तलावात एक लाख रुपयांचे मत्स्यबीज टाकण्यात आले होते. या तलावातील मासे मोठे झाले, की दुसऱ्या तलावात नेऊन सोडले जातात. मात्र कुशारी येथील चार ते पाच तरुणांनी तलावावर 4 इंजिन लावून पाण्याचा उपसा केला. संपूर्ण तलाव रिकामा केल्यामुळे मासे तडफडून मरण पावले. केवळ काही प्रमाणात मासे चोरण्यासाठी या तरुणांनी चक्क तलावच कोरडा केला. त्यामुळे ढिवर बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
कुशारी गावाशेजारी हा तलाव असल्याने तलावालगत असलेल्या शेतकऱयांना या तलावाचे पाणी शेतीसाठी मिळते. गावातील जनावरांना उन्हाळ्यात पाण्याची सोय होते. मात्र या तरुणांनी जी चूक केली आहे, त्याचे नुकसान केवळ मत्स्य पालन संस्थेलाच झाले नाही, तर मुक्या जनावरांनाही त्याची झळ पोहोचणार आहे. जिल्ह्यात कमी पावसाने आणि तीव्र उन्हामुळे पाण्याची पातळी खाली जात आहे. अशात या तरुणांनाचा मूर्खपणा अधिकच घातक ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास विमा असल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळते. मात्र मत्स्य उत्पादक लोकांचे मासे मरण पावले तर त्यांना कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून मिळत नाही. त्यामुळे ज्या लोकांनी हे कारस्थान केले, त्यांच्याकडून ही नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या तक्रारीत कुशारी येथील नारायण साकुरे, विजय समरीत, विलास दिपटे यांची नावे आहेत.
पाणी हे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि जर देशाच्या संपत्तीचे कुणी, अशा पद्धतीने नुकसान करीत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी एकलव्य सेनेचे संजय केवट यांनी केली आहे.