भंडारा - दिवसेंदिवस भंडारा जिल्ह्यातीलही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आज (रविवार) 6 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामध्ये एका 10 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी आज गेला आहे.
आज आढळलेल्या 6 रुग्णांमुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 170 वर पोहोचला आहे. आज पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान 30 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या तरुणाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना त्याला कोरोना झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
आज मिळालेल्या 6 रुग्णांमध्ये 3 रुग्ण हे मोहाडी तालुक्यातील असून भंडारा तालुक्यातील एक, तुमसर तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील 31 वर्षीय तरुण हा कुवैतवरून आला होता. तर 45 वर्षीय पुरुष हा हावडा येथून आला होता. तर मोहाडी तालुक्यात नाशिक येथून 25 वर्षीय तरुण आणि 36 वर्षीय तरुण आले होते. तर एका दहा महिन्याच्या मुलाचाही यामध्गाये समावेश आहे. हा संशयित बालक तुमसर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. सध्या केवळ त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यानंतर त्याची आई आणि वडील यांना क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या घश्याचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत. तर त्यांच्या गावातील सर्व लोकांच्या आरोग्याची तपासणी उद्या केली जाणार आहे. या 10 महिन्याच्या मुलाला कोरोना झाल्यामुळे, सध्या गावात प्रशासकीय अधिकारी कर्मचारी माहिती गोळा करत आहेत. तर सहावा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल हा भंडारा तालुक्यातील आहे. या 30 वर्षीय तरुणाचा अहवाल येण्याअगोदरच मृत्यू झाला होता.