भंडारा- ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यात अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे. सोमवारी सकाळी गराडा येथील एका 45 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भंडारा जिल्हा आता हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होताच गेल्या काही दिवसांपासून निश्चिंत असलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानंतर गराडा आणि त्या परिसरातील तीन किलोमीटरचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. तसेच या महिलेला कोणापासून कोरोना झाला आणि तिच्या संपर्कात कोणकोण आले, याचा शोध घेणे सुरू आहे.
ग्रीन झोन गेला... भंडारा जिल्ह्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण गराडा मधील कोरोनाबाधित महिला क्षयरोगाचा उपचार घेत होती. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून तिच्या घरी जाऊन तिची नियमित तपासणी करून औषध उपचाराचीही चौकशीही केली जात होती. मात्र, 23 तारखेला या महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिला कोरोनाच्या विशेष कक्षात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यानंतर या महिलेचे घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. सोमवारी त्याचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह असा आला. सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी प्रदीप चंद्र यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.
महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची सोशल मीडियावर अफवा-
संबंधित कोरोनाबाधित महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच सोशल मीडियावर पसरली होती. त्यानंतर प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन संबंधित महिला व्यवस्थित असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवहानही त्यांनी यावेळी केले. हा जरी पहिला रुग्ण असला तरी अजूनही रुग्ण आढळतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाबाधित महिला ज्या गराडा भागात वास्तव्यास होती, तेथील ३ किमीचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर कऱण्यात आला आहे. तसेच खबरदारीचे उपाय म्हणून त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचा मुलगा नागपूर वरून येणे-जाणे करत असल्याने त्यापासूनच या महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
तसेच या महिलेवर उपचार करण्याऱ्या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. भंडारा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने प्रशासन काहीसा निष्काळजी पणा करीत होता. जिल्हा बंदी असूनही नागपूर वरून लोकांचे येणे सुरूच होते. या सर्व प्रकारामुळे लवकर भंडारा हा ऑरेंज किंवा रेड झोन मध्ये जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली गेली होती. याबाबत ईटीव्ही भारतने याबाबतची बातमीही प्रसारित केली होती.