भंडारा- महाराष्ट्रातील भंडारा हा असा एकमेव जिल्हा होता तेथे कोरोनामुळे कालपर्यंत एकही मृत्यू झालेला नव्हता. मात्र, आज पहाटे साडेचारच्या दरम्यान 30 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या तरुणाची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना त्याला कोरोना झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
भंडारा जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असून आज 3 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे. 87 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 79 रुग्ण उपचार घेत आहेत.
रविवारी पहाटे 4 वाजता भंडारा शहरातील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तरुणाची कोणतीच ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना त्याला कोरोना विषाणू संसर्ग कसा झाला हे शोध घेण्यासाठी प्रशासन कामाला लागला आहे. हा तरुण एका खासगी रुग्णालयात निमोनिया सारख्या आजारावर उपचार घेत होता.
4 दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला शासकीय कोरोना सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. पहाटे चार वाजता त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा हा पहिला मृत्यू असून तो शहरातील मध्य भागातील रहिवासी असल्याने शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.