भंडारा- जिल्ह्यात मान्सून पावसाचा जोरदार आगमन झाल्यानंतर शेतकरी आनंदित झाले होते. मात्र काही शेतकऱ्यांचे या पावसामुळे नुकसानही झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धान लावले होते, आणि कापणी करुन शेतात ठेवले. त्यापैकी काही शेतकऱ्यांचे धान या पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आता हे धान वाळवण्यासाठी त्यांची रस्त्याच्या कडेला धडपड सुरू आहे.
उन्हाळी धान पावसाने शेततातच भिजले, शेतकऱ्यांचे नुकसान मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसला. या मुसळधार पावसाने दोन जिल्ह्यात अतिवृष्टी सुद्धा झाली. एकीकडे या मुसळधार पावसाने खरिपाची तयारी करणारे शेतकरी आनंदित झाले. शेतीच्या मशागतीला तसेच पेरणीला सुरुवात केली. मात्र त्या क्षणी या पावसामुळे उन्हाळी धान पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
भंडारा जिल्ह्याच्या वरठी गावातील सुनंदा लेंडे या शेतकरी महिलेने तीन एकरामध्ये उन्हाळी धानाची लागवड केली होती. खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणाचा फटका त्यांना बसला होता. त्यामुळे या उन्हाळी पिकामुळे तरी नुकसान भरुन निघेल अशी अपेक्षा त्यांना होती. अपेक्षेनुसार धानाचे पीक चांगले झाले होती.
धान कापणी करुन त्याच्या पेंड्या शेतातच ठेवण्यात आल्या. मात्र मंगळवारी जोरदार पावसामुळे या पेंड्या शेतातच ओल्या झाल्या. त्यांची मळणी करायलाही शक्य होत नव्हते. त्यामुळे तीनशे रुपये प्रमाणे चार माणसे लावून या ओले झालेल्या धानाच्या पेंढ्या राज्य महामार्गावर सुकवण्याचे काम सुरू झाले. काही प्रमाणात सुकल्या नंतर थ्रेशरने मळणी केली. मळणी झाल्यावर नंतर हे धान पुन्हा रस्त्यांवर वळवायला ठेवण्यात आले. ज्या धानाला त्यांना 2500 रुपये दर मिळण्याची अपेक्षा होती, ते धान आता केवळ 1000 क्विंटलने विकल्या जाणार आहे. एव्हढेच नाही, तर जवळपास 2500 हजार रुपये हा मजुरांचा नवीन खर्च त्यांना आला आहे. या शेतकऱ्याप्रमाणे जिल्ह्यातील अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत.