भंडारा : गरज ही आविष्काराची जननी असते, असे म्हटले जाते. या वाक्याला भंडारा जिल्ह्यातील सातोना गावातील एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने अगदी खरे ठरवले आहे. त्याने टाकाऊ वस्तूंपासून स्पर्श विरहित सॅनिटायझर मशीन बनवली आहे. ही सॅनिटायझर मशीन त्याने वरठी पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. या मशीनमुळे वरठी पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे.
तुमसर तालुक्यातील सातोना या छोट्याशा गावात राहणारा सुबोध गजभिये हा सध्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद असल्याने तो गावी परत आला. नावीन्यपूर्ण कार्य करण्याची नेहमी तळमळ असलेल्या सुबोधला त्याच्या फावल्या वेळाचे सदुपयोग करायचे होते. वर्तमान परिस्थितीत कोरोनाचा प्रभाव आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव हा स्पर्शाने जास्त होतो, याची जाणीव त्याला होती.
भंडाऱ्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थाने बनवली स्पर्शाशिवाय कार्य करणारी सॅनिटायझर मशीन... हेही वाचा...'कोरोना महामारीला संधीमध्ये बदलून देशाला आत्मनिर्भर बनवूया'
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेहमी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे, असे आरोग्य विभागातर्फे सांगितले जाते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी वारंवार स्पर्श झाल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्पर्श विरहित सॅनिटायझर मशीन बनवण्याच्या कल्पना त्याला सुचली. घरातील उपलब्ध असलेल्या कार्डबोर्डचे त्यानी डिझाईन बनवले आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मशीन बसवली. ही मशीन इलेक्ट्रिक किंवा बॅटरी या दोन्ही उपकरणाने चालते.
मशीनच्या खाली हात ठेवल्यावर त्यातून सॅनिटायझर येते. त्यामुळे सॅनिटायझरला कुठेच स्पर्श होत नाही. ही बनवण्यासाठी त्याला फ्कत 800 रुपये खर्च आला. बाजारामध्ये अशा मशीन उपलब्ध आहेत. मात्र, त्याची किंमत सुबोधने बनवलेल्या मशीनच्या तुलनेत चारपट आहे. ही मशीन बनवून त्यांनी वरठी पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. पोलीस स्टेशन म्हणजे सार्वजनिक जागा जिथे दररोज कर्मचारी आणि तक्रादार मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे लोकांशी सरळ संबंध येत असल्याने पोलिसांना मोठा धोका निर्माण होत आहे. या मशीनमुळे आता सॅनिटायझर करण्यासाठी कोणत्याही बॉटलला कोणाचाही स्पर्श होत नसल्याने कोरोना प्रादुर्भाव टाळता येत आहे. त्यामुळे वरठी पोलिस यंत्रणा या अविष्कारामुळे भारावून गेले आहेत.
सुबोधला या अविष्कारानंतर बऱ्याच कंपनी तर्फे बोलावणे आले. मात्र, कमीत कमी किंमतीत या मशिनला अधिक आधुनिक करून लोकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. या अविष्कारामुळे सुबोध भविष्यात एक उद्योजक बनू शकेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या काळात लोकांनी आत्मनिर्भर बनावे असे सांगितले. सुबोधने केलेले हे अविष्कार हा मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने तरुणांनी उचललेले एक पाऊल आहे.