भंडारा- जिल्ह्यातील दुकाने उघडण्यासाठी परवानगी घेताना 500 रुपये शुल्क घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. दुकाने सुरू करण्याचे परवाने निशुल्क द्यावे, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पुन्हा एकदा ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल पालकमंत्र्यांनी घेत प्रशासनाला आदेश दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रात दुकाने सुरू करण्यासाठी 500 रुपये शुल्क आकारले जात असल्याची बातमी ईटीव्ही भारतने शुक्रवारी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल पालकमंत्री सुनील केदार यांनी घेतली आहे. परवाने देण्यासाठी शुल्क आकारु नये असे, निर्देश केदार यांनी दिले.
लॉकडाऊनच्या काळात लोकांचे व्यवसाय बंद झालेले आहेत. परिणामी रोजगाराच्या साधनाअभावी नागरिकांना आर्थिक चणचण भासू लागली. दुकानदारसुध्दा कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून स्वयंपूर्तीने सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करीत आहेत. अशा परिस्थिती जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी तसेच इतर व्यवसायासाठी प्रशासनाने कोणतेही शुल्क आकारु नये, असे निर्देश पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले.