भंडारा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती समोर येताच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांचा घशाचा नमुना तपासणीसाठी पाठविला असतांनाही तो आज आपल्या कार्यालयात आलाच कसा, असा प्रश्न दिवसभर चर्चेला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ऑफिसमधूनच त्याला कोरोना सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर, जिल्हा परिषद रविवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही वार्ता कळताच जिल्हा परिषदेत एकच गोंधळ उडाला. या कर्मचाऱ्याकडे साकोली तालुक्यातील जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे बरेचदा तो भंडाऱ्यावरून कामानिमित्त साकोली येथे जात होता. मात्र, बुधवारी तो भंडारा जिल्हा परिषद येथील त्याच्या आरोग्य विभागाच्या ऑफिसमध्ये कामावर आला होता. परंतु, आधीच त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर, बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्याला ऑफिसमधूनच कोरोना उपचारसाठी नेण्यात आले. यानंतर संपूर्ण जिल्हा परिषद ही बाहेरील लोकांसाठी बंद करण्यात आली. तर, कर्मचाऱ्याना त्यांच्या ऑफिसमध्येच राहण्याचे आदेश दिले गेले.