भंडारा : भंडारा शहरात स्नेहनगर येथे राहणाऱ्या चव्हाण कुटुंब यांच्या घरी मागील दोन दिवसांपासून पाहुण्यांची रेलचेल सुरू होती. कारण चार एप्रिलला मृत डॉक्टरचे लग्न होते. २ तारखेला मेहंदीचा कार्यक्रम गाज्याव्याज्यात पार पडला. सोमवारी 3 तारखेला हळद आणि 4 तारखेला लग्न होते. मात्र सोमवारी सकाळी 10.30 घरात रडण्याचे आवाज ऐकु येवू लागले. मेहंदीने रंगलेल्या हातानेच डॉक्टरने हळदीच्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना समजली. आत्महत्येमागील कारण कळू शकलेले नाही. डॉ. कुणाल भाऊराव चव्हान (35) रा.स्नेहनगर तकिया वॉर्ड असे मृताचे नाव आहे. ते नागपूर मेयो रूग्णालयात कर्तव्यावर होते.
घरातच केली आत्महत्या: जानेवारी महिन्यात डॉ. कुणालचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील डॉक्टर तरूणीशी लग्न जुळले. 4 एप्रिल ही लग्नाची तारीख ठरली. त्यातच चव्हान कुटुंबांकडे 2 एप्रिलला मेहंदीचा कार्यक्रम झाला. 3 एप्रिलला हळद, 4 एप्रिलला नागभीड येथे लग्नसोहळा आणि 5 एप्रिलला भंडारामध्ये स्वागत समारंभ असे कार्यक्रम ठरले होते. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. सोमवारी सकाळी झोपून उठल्यानंतर कुणालने चहा घेतला आणि परत आपल्या खोलीत गेला. परंतु, बराच वेळ तो बाहेर न आल्यामुळे त्याचे वडिलांनी खोलीत जावून बघितले. तर मुलाने आत्महत्या केल्याचे दिसले. कुटुंबाने घटनेची माहिती भंडारा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर सायंकाळी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.