भंडारा - जिल्ह्यात पहिल्यांदाच 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी एक व्यक्ती हा विदेशातून आला आहे. तर दुसऱ्या व्यक्तीची अशी कोणती माहिती नाही. या दोघांच्याची स्वॅबचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले असून लवकरच या विषयीचा अहवाल प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदाच सापडले संशयित रुग्ण, दोघांनाही केले विशेष कक्षात भरती जिल्ह्यात आतापर्यंत 44 लोक विदेशातून आले असल्याची माहिती आहे. यापैकी 31 लोकांचे त्यांच्या घरीच अलगिकरण करण्यात आले आहे. तर, 12 लोकांचे नर्सिंग हॉस्टेल येथे अलगिकरण करण्यात आले आहे. यापैकी 5 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, नर्सिंग होस्टेलमध्ये अलगिकरण विभागात असलेल्या व्यक्तीपैकी एकाला कोरोनाचे लक्षणे दिसल्याने त्याला विशेष कक्षात ( isolation ward) मध्ये भरती करण्यात आले आहे.
तसेच एका 65 वर्षीय व्यक्तीला जो खासगी रूग्णालयात उपचार घेत होता, त्याला सुद्धा लक्षणे दिसत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी विशेष कक्षात भरती केले आहे. या दोघांचेही नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले असून उद्यापर्यंत यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत मुंबई, पुणे आणि इतर राज्यातून 3 हजार 571 लोक भंडाऱ्यामध्ये परत आले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. भंडारा जिल्ह्यासाठी आजपर्यंतची सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. मात्र, हा संशयित व्यक्ती विदेशातून आला असल्याने त्याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रनेपासून प्रत्येकजण एकच अपेक्षा करत आहे की, हा अहवाल निगेटिव्ह यावा.