भंडारा - जिल्ह्यात रविवार(काल) कोरोना रूग्ण संख्येचा विस्फोट पहायला मिळाला. इतर दिवसांच्या तुलनेत रुग्ण संख्या दुप्पट झाली आहे. रविवारी ४३९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. परिस्थिती बिकट असतानाही नागरीक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी कठोर आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी काही जागरूक नागरिक करत आहे.
रविवारी कोरोनाचा विस्फोट
रविवारी भंडारा जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी समोर आली ती संपूर्ण नागरिकांना हादरवून सोडणारी होती. भंडारा जिल्ह्यात शनिवारी २०० कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. मात्र रविवारी ही संख्या दुप्पट होऊन ४३९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. एकाच दिवशी दुप्पट रुग्णसंख्या आढळल्याने नागरिक हादरून गेले आहेत. असे असले तरी जिल्ह्यात अजूनही बेफिकीरपणे फिणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.