भंडारा -एकीकडे भंडारा जिल्ह्यात होत असलेला कोरोनाच्या रुग्णांचा उद्रेक आणि दुसरीकडे जिल्ह्यातील नागरिकांची असहकार्याची पद्धत त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव हे रस्त्यावर उतरले. नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे ते सांगत आहेत. आता जिल्ह्यातील प्रमुख दोन अधिकारी जर रस्त्यावर उतरून नागरिकांना कायद्याचे पालन करण्यास सांगत असतील तर नागरिकांचेही कर्तव्य आहे, की त्यांनी आता तरी नियमांचे पालन सक्तीने करावे.
पवनी तालुक्यात परेड
भंडारा जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अशी वारंवार विनंती जिल्हाधिकारी करीत होते. मात्र नागरिक हे त्यांच्या इच्छेनुसारच कोरोनाचे सर्व नियम मोडून वावरत असल्याचे प्रत्येकवेळी दिसले. आता तर जिल्ह्यात दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येचा स्फोट होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 7पर्यंत रात्रकालीन संचारबंदी लागू केली आहे. तर भंडारा जिल्ह्याचा पवनी तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालल्याने संध्याकाळी पवनीत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी पथसंचलन करत कोरोना नियम पाळण्याच्या इशारा वजा सूचना दिल्या आहे. या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी पवनी शहरातील पद्मा वार्ड व सोमवारी वार्ड येथील प्रतिबंधक क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली.
रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या वर
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णाने 20 हजारांचा आकडा पार केला असून दररोज रुग्ण संख्य वाढत आहे. शनिवारी भंडारा जिल्ह्यात 846 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यामध्ये भंडारा तालुक्यात 354, मोहाडी तालुक्यातील 124, तुमसर तालुक्यात 79, पवनी तालुक्यात 88, लाखनी तालुक्यात 109, साकोली तालुक्यात 70, लाखांदूर तालुक्यात 22 रुग्ण आढळून आले होते. सुरुवातीला केवळ शहरात रुग्णसंख्या वाढत होती. आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. असे असतानाही नागरिक मात्र कोरोनानियम पाळत असल्याचे दिसत नाही आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रात्री 8 ते सकाळी 7पर्यंत संचारबंदी लागू केली आहे आणि स्वतः पाहणी करून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचा संदेश देत आहेत.