भंडारा -प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती आणि विक्री करण्यावर भंडारा नगरपरिषदेने बंदी घातलेली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेत नगरपरिषदेने घातलेल्या बंदीचा लोकांनी स्वीकार करून या मूर्ती खरेदी करू नये. तसे कुठे दिसल्यास त्याची तक्रार करावी, असे आवाहन नगर परिषदेचे उपाध्यक्ष अशू गोंडणे यांनी केले आहे. पीओपीच्या मूर्तींची विक्री करणाऱ्यांवर ५ हजार ते २५ हजार पर्यंतचा दंड आकारण्यात येईल किंवा कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भंडाऱ्यात श्रीकृष्णजन्माष्टमी, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव या काळात मोठ्या प्रमाणात मूर्तींची स्थापना केली जाते. मागील काही वर्षांपासून परप्रांतीय मूर्तीकार भंडारा जिल्ह्यात पीओपीच्या मूर्ती विक्री करतात. अत्यंत आकर्षक आणि कमी किमतीत असलेल्या मूर्ती घेण्याकडे भाविकांचा कल असतो. दरवर्षी शहरात विविध ठिकाणी या मूर्तींची सर्रास विक्री करण्यात येत होती. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करत ३१ डिसेंबर २०१८ रोजी भंडारा नगरपालिकेने ठराव घेत ग्रामीण आणि शहरी भागात पीओपींच्या मूर्ती विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली.
पीओपीच्या मूर्ती दिसायला देखण्या आणि कमी किमतीच्या असल्या तरी पर्यावरणासाठी अतिशय घातक आहेत. मूर्ती विसर्जन केल्यानंतर या मूर्ती विरघळत नसून कालांतराने त्या पाण्यावर तरंगतात किंवा काठावर दिसतात. त्यामुळे लोकांच्या भावना ही दुखावल्या जातात आणि पर्यावरणाचे देखील नुकसान होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुंभार महासंघाने पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी आणण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पीओपीच्या मूर्तीची विक्री बंद करण्याचा आदेश दिला होता आणि त्यानुसार नगरपालिकेने तत्काळ या बंदीचा ठराव घेतला आहे.
नागरिकांनी पर्यावरणाच्या बचावासाठी पुढाकार घेत माती अथवा शाडूच्या मूर्तीची खरेदी करावी. तसेच पीओपीच्या मूर्तीची विक्री कुठे होत असल्यास त्याची सूचना नगरपालिकाला द्यावी अशी विनंती भंडारा नगरपालिकेचे उपाध्यक्ष आशु गोंडणे यांनी केली आहे. तर, अशा पद्धतीच्या मूर्तींची विक्री करणाऱ्या लोकांवर ५ हजार ते २५ हजारापर्यंतचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दरवर्षी मूर्तींची विक्री ही गांधी चौकाच्या बाजारपेठेत व्हायची. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती. यावर पर्याय शोधून यावर्षीपासून मूर्तींची विक्री ही दसरा मैदानात ठेवण्यात आलेली आहे. तरी सर्व नागरिकांनी दसरा मैदानातून मूर्ती खरेदी करावी असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.