भंडारा - गावाबाहेर शेतामध्ये तात्पुरता मांडव घालून यामध्ये लाल मिरचीचे देठ तोडण्याचे काम जेथे होते त्याला ग्रामीण भागात 'सातरा' असे म्हटले जाते. 'सातरा' ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवून देणारे एक छत्र बनले आहे. येथे दररोज हजारो लोकांना रोजगार मिळतो. विशेष म्हणजे येथे वेळेचे बंधन नाही आणि तुम्ही केलेल्या कामानुसार पैसे मिळतात. फक्त कामाचा मोबदला हा अपेक्षेपेक्षा कमी आहे. मात्र रोजगार मिळत असल्याने कामगार संतुष्ट आहेत.
ज्या लाल मिरचीपासून आपण दूर राहतो त्याच लाल मिरचीचा देठ तोडण्याचा हा रोजगार आहे. लहान मुलांपासून तर वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण येथे मोठ्या आनंदाने काम करतात. या सातरामध्ये कोणी एकटा तर कोणी पती-पत्नी तर कुठे संपूर्ण कुटुंब कामाला असते. सध्या शाळांना सुट्टी लागल्यामुळे मुले आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी येतात. तर रोजगार हमीचे आणि शेतीचे काम बंद असल्याने हाताला काम मिळत नसल्याने स्त्री-पुरुष या कामावर येतात. सुरुवातीला या कामाचा त्रास होतो. हाताला जळजळ होणे, खोकला येणे असा त्रास होतो. मात्र कालांतराने याची सवय होऊन नंतर प्रत्येक जण हा काम आवडीने करतो.