भंडारा- महिला पोलीस अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोलून हात पकडून धक्का दिल्यामुळे तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरोधात तुमसर पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणि विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार चरण वाघमारेंसह भाजप शहराध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
महिला पोलीस अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोलून हात पकडून धक्का दिल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरोधात तुमसर पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणि विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की सोमवारी 16 सप्टेंबरला तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असताना नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे उपस्थित एका गर्भवती महिलेला अशा परिस्तिथी घरी कशी जाशील? असे विचारले असता तिथे उपस्थित भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांच्या घरी पेटी पोहचवून देणार असे म्हटले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना असे न बोलण्याची विनंती केली. मात्र, जिभकाटे यांनी त्यांच्याशी भांडण सुरू करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केले. त्यानंतर तिथे आमदार चरण वाघमारे आले आणि त्यांनीही त्या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोलले आणि नंतर अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याचे हात पकडून धक्का दिला.
या प्रकराने हादरलेल्या महिला अधिकाऱ्यांनी आज (ता. १८) पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून आमदार आणि शहर अध्यक्ष यांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम 353, 354, 472, 504,506, 34 नुसार गुन्हा दाखल केले आहे. सध्या आमदार आणि शहर अध्यक्ष यांना अटक केली नाही.