भंडारा -गुरुवारी मतमोजणीनंतर भंडारा-गोंदिया जिल्हा भाजप मुक्त झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 2014मध्ये भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सात पैकी सहा उमेदवार हे भाजपचे निवडून आले होते. मात्र, 2019 च्या निकालानंतर भाजपचा केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. दरम्यान, पक्षांतर्गत कलह, दिलेले उमेदवार, शासनाने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्यात आलेले अपयश या सर्व गोष्टींमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पराभवाचे तोंड पाहावे लागल्याचे मत खासदार सुनील मेंढे यांनी मांडले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे सुनील मेंढे यांनी तब्बल दोन लाख मतांनी विजय मिळविला होता. मात्र सहाच महिन्यात भाजपला याच दोन्ही जिल्ह्यांमध्ये पराभव पाहायला मिळाला आहे. याचे कारण विचारले असता, खासदार मुंडे म्हणाले, "आलेला निकाल हा आमच्यासाठीही धक्कादायकच आहे. पराभवाची नेमकी कारणे कोणती? याची पक्षांतर्गत चर्चा करून त्यावर तोडगा काढू. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही वेगवेगळ्या निवडणुका आहेत. कारण, लोकसभेमध्ये केंद्राची कामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव होता. तर, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र शासनाने बरेच काम केले असले तरी ते कामे आम्ही लोकांपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरलो आहोत. तसेच पक्षांनी दिलेले काही उमेदवार आणि पक्षांतर्गत असलेला कलह यामुळेसुद्धा आमचा पराभव झालेला आहे. या दोन्ही जिल्ह्याचा खासदार असल्यामुळे या सर्व गोष्टींची जबाबदारी मी घेतो आणि मतदारांनी दिलेला हा कौल आम्ही स्वीकारतो" येणाऱ्या काळात पराभवाची सर्व कारणे शोधून अधिक जोमाने चांगले काम करू,असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -पटोले-फुके कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; एक गंभीर जखमी