भंडारा- भाजपचे माजी नगरसेवक आणि निष्ठावंत कार्यकर्ते अरुण भेदे यांनी जाहीर कार्यक्रमात मंचावर जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भाजपने आयोजीत केलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर आमदार आणि नगराध्यक्ष उपस्थित होते. या घटनेमुळे मंचावर काही काळ मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता.
आमदार परिणय फुके, उपाध्यक्ष अशोक गुंड आणि आणि पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या सतर्कतेमुळे ही अनुचित घटना टळली. अरुण भेदे मागील ३० वर्षांपासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तसेच ते माजी नगरसेवक ही होते. सध्या भाजपच्या स्वच्छ भारत अभियानाचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांच्या घरासमोरील शासकीय जागेवर अवैध बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम थांबवून तोडण्याची मागणी मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. बांधकाम अवैध असल्याचे पत्रही मुख्याधिकारी यांना दिले आहे. मात्र, नगराध्यक्षांच्या प्रभावामुळे ते अवैध बांधकाम पाडले जात नाही. या विषयी त्यांनी पालक मंत्र्यांनाही सांगितले होते. मात्र, कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आज कार्यक्रम सुरू असताना पालकमंत्र्यांना निवेदन देत अंगावर रॉकेल टाकून आत्मदाहनाचा प्रयत्न केला.
प्रसंगावधन राखत त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर आमदार चरण वाघमारे यांनी त्यांची समजूत काढली. अरुण भेदे राहत असलेल्या टाकळी क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ मध्ये शासनाच्या जागेवर भाजपच्या एका नगरसेविकेच्या नातेवाईकांच्या घराचे बांधकाम सुरू आहे, बांधकाम सुरू करण्याअगोदर त्या ठिकाणी ज्योतीबा फुले यांचा पुतळा होता.