भंडारा -पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी अनोख्या शक्कल लढवल्या जातात. भंडारा पोलिसांनी अशीच वेगळी शक्कल लढवत वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारला. सद्या भंडारा पोलिसांनी वाळू माफियांविरोधात लढवलेली अनोखी शक्कल चर्चेचा विषय ठरली आहे.
घडले असे की, मागील अनेक महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यातील वाळू घाट बंद आहेत. पण वाळू माफिया मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा करत आहेत. यासंदर्भात माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या. तेव्हा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
भंडारा पोलिसांनी वाळू माफियांना पकडण्यासाठी लढवली अनोखी शक्कल... पोलिसांनी अनेकदा छापा मारला, पण त्यांना खाली हात परतावे लागले. कारण वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी पगारी माणसे नेमली होती. पोलीस छापा घालणार हे समजताच, वाळू माफिया आपल्या साधनांसह वाळू घाटावरून पळ काढत असे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नामी शक्कल लढवली आणि वऱ्हाडींचे रूप घेऊन खासगी गाड्यातून घाटावर जाण्याचे ठरवले. पोलिसांनी त्यासाठी एका गाडीला नवरदेवाच्या गाडीप्रमाणे सजवले आणि कारवाईसाठी निघालेल्या तीनही गाड्यांवर मॅरेज पार्टीचे बॅनर लावले. या गाड्यांमध्ये जवळपास पंधरा पोलिसांनी पवनी तालुक्यातील खातखेडा गावातील वाळू घाटावर रात्री बारा वाजता छापा मारला. अचानक पोलिसांच्या छाप्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले.
वाळू माफियांच्या खबऱ्यांना याचा सुगावा लागला नाही. यामुळे ही कार्यवाही यशस्वी ठरली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८ जेसीबी, १२ टिप्पर तसेच वाळू असा एकूण ३ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यासह पोलिसांनी या कारवाईत ९ लोकांना अटक केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कायदेशीर कार्यवाहीनंतर महसूल विभागातर्फे दंडात्मक कारवाई झाली तर शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो. यामुळे महसूल विभाग नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.